Advertisement
गंमत म्हणून प्रेताला तरंगत ठेवते, जिवंतांना मात्र बुडवीत असते
:लक्ष्यवेधी विशेष :
सोलापूर : पहिला टप्पा, दुसरा टप्पा करीत चौथ्या टप्प्या पर्यंत मान्यता दिली आहे. प्रशासनातल्या अटींची पूर्तता करून चौथ्या टप्पयाची मान्यता घेण्यात हरकत नाही असे सरकारने बजावले आहे. शिक्षक भरतीसाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद शिक्षण सेवक भरतीसाठी तीन वर्षाचे टप्पे पाडून भरतीची उघडपणे जाहिरात केली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षक भरतीचे सर्व सोपस्कर पुर्ण केले असून शिक्षण विभागाचे ओझे डोक्यावरून खांद्यावर आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.
टप्पा अनुदानातील शाळांना ४० टक्क्यावरून ६० टक्क्यावर आणि मग ६० वरून ८० टक्क्यावर वाढीव टप्पा अनुदान मंजुर केले आहे. पंरतु जाचक अटींचा कोलदांडा घालून शेवटचे टप्पा अनुदानच मोठे अडचणीचे ठरले आहे! एकूणच टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांना सवती मत्सराच्या अनुदानात अडकवले असून शिक्षकाला आयुष्याच्या शेवटी आपली सेवाच संपुष्टात येणार मगच शासनाचे समाधान होणार! या भावनेने शिक्षक ग्रासला असून भयभीत झाला आहे. कारण उपवर झालेल्या दोन मुली, त्यांची लग्नं, काढलेले कर्ज यामध्ये अवघा संसारच मोठा मेटाकुटीला आला आहे. एकूणच शिक्षक कर्जात अडकला असून भरीस भर म्हणून टप्पा मान्यतेने सुखावलेले शिक्षक घरातल्या काळजीने वर्गातल्या शिकवण्यावर मोठा अनिष्ठ परिणाम झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाने आणि कडक मुख्याध्यापकाच्या आदेशाने शिक्षकाची अवस्था ना घरका ना घाटका ! अशा संकटात सापडली आहे. त्यातच संकटं रांग लावून येतात आणि मग खाजगी सावकाराने व्याजाचा काढलेला फणा कर्ज आणि टप्पा मान्यतेने खुशीत आलेला संस्थाचालक जोर लावून तगादा लावतो आहे. त्यामुळे प्रामाणिक शारदेची सेवा करणारा शिक्षक मोठ्या अडचणीत सापडला आहे. तीन लेकराचा बाप म्हणून उतरलेला चेहरा घेऊन संध्याकाळी घरी जाणारा शिक्षक संकटाच्या खिंडीत अडकला आहे. कारण १९ वर्षे झाली तरी शाळा संस्थाचालकाच्या संघर्षात अडकली असून ४० टक्क्यातच घुटमळताना दिसते. तर पंधरा वर्षे झाली वीस टक्क्यातच शाळा उचक्या देताना दिसते. त्यामुळे जिल्हयातल्या शाळांची शिक्षण कहाणी अधिकच बीकट झाली आहे. शिक्षणाधिकारी शाळेवर आला की शिक्षक कोरोना आला म्हणून भयभीत होतात, पाणी आणुन त्याचं स्वागत करतात. त्यामुळे शाळांची शिक्षण कहाणीच अधिक बिकट झाली आहे. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण, लाडक्या लेकीची योजना तडकाफडकी निधी वळता करील आणि अचानक वाढत्याचं पातेलं आणि कागदावरचं वगराळ रिकामं होईल या भितीनेच आता शिक्षक हवालदिल झाला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे राबणारा शिक्षक शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस कधी येतील याची वाट पाहतो आहे.
मुख्यमंत्र्याची लाडकी लेक आता सत्तेची मालकीण झाली असून मुख्यमंत्र्याची बहीण प्रशासनाची कारभारीण झाली आहे. अशावेळी पंधराशे रुपयांऐवजी २१०० रुपये मिळणार या आशेने झाडून शेजाऱ्याला, दैवाला आणि देवाला सख्ख्या भावाला, जन्मदात्या बापालाही हात जोडून मतदानाचा निरोप कानात सांगुन झाला आहे. सगळ्यांनाच कामाला लावले आणि सत्तेवर आणले. आता सत्तेची जन्मदात्री म्हणून सत्ताधाऱ्यांच्या कानात लाडक्या लेकीने सांगुन टाकले. म्हणून शिक्षकांनाही वाटते, शंभर टक्क्याच्या टप्प्यात रक्षाबंधनासाठी आणावे याबद्दल राज्यातला शिक्षक आता डोळे लावून बसला आहे. परंतु बहीण भावाचे रक्षाबंधन त्याचे पावित्र्य सत्ताधारी राखणार का? कारण झेडपीची आणि मनपाची अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांची संधी मिळवून देताना लाडक्या लेकींनी बांधलेले सत्तेचे रक्षाबंधन सुरक्षित राहील का? याची काळजी वाटते. कारण दाळ महागली, तेल महागले, साखर कळसाला पोहोचली परंतु २१०० रुपयाच्या नव्या संगितात कसलीच महागाई आता मतदारांना ऐकू येत नाही. हेच खरे वास्तव आहे. एकूणच राजकारणातले पाणी मोठे लबाड असते. गंमत म्हणून प्रेताला तरंगत ठेवते आणि जिवंतांना मात्र बुडवीत असते. या सर्वच लाटावरच्या राजकारणात टप्यात अडकलेल्या शिक्षकांना जिवंत राहणे मुश्किल झाले आहे. घरातलेच संस्थाचालक आणि राबणारे सर्व शिक्षकही घरातलेच त्यामुळे घरातला संघर्ष अंगणात आला तर वादाचे विषय चव्हाट्यावर येतील आणि शिक्षणाचे पावित्र्य, त्याची लागलेली कळवंड गावाला पाहणे फार कठीण होईल.
