Advertisement
मुंबई : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 चा अहवाल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केला. या पाहणीच्या सन 2024-25 च्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन 2023-24 च्या तुलनेत 7.3 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24 मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक 13.5 टक्के आहे. सन 2024-25 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 3,09,340 अंदाजित असून सन 2023-24 मध्ये ते 2,78,681 होते.
सन 2024-25 मध्ये कृषि व संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धित अनुक्रमे 8.7 टक्के, 4.9 टक्के व 7.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन 2024-25 मध्ये अंदाजित सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 45,31,518 कोटी आहे तर अंदाजित वास्तविक सन 2011-12 च्या स्थिर किंमतींनुसार स्थूल राज्य उत्पन्न 26,12,263 कोटी आहे.पहिल्या सुधारित अंदाजांनुसार सन 2023-24 चे अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 40,55,847 कोटी आहे, तर सन 2022-23 मध्ये ते 36,41,543 कोटी होते. सन 2023-24 चे अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 24,35,259 कोटी आहे. तर सन 2022-23 मध्ये ते 22,55,708 कोटी होते.
