#

Advertisement

Monday, March 17, 2025, March 17, 2025 WIB
Last Updated 2025-03-17T11:33:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

इतिहासातील मढी उकरून नेमका कुणाचा फायदा?

Advertisement

'बीआरपी'च्या प्रदेशाध्यक्ष ऍड.कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा परखड सवाल

पुणे : वैभवशाली इतिहासाचा अभिमान असायला हवा; परंतु इतिहासातील मढी उकरुन काढून त्यातून हाती काय लागणार, हे तपासलं पाहिजे. कारण एकीकडं देश भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, गुन्हेगारी, जातीयवाद अशा प्रश्नांनी जळत असताना दुसरीकडे असे माथी भडकविणारे विषय उकरुन हेतुपुरस्सर जनतेचे लक्ष भटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे परखड मत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड.कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी माडले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचे राजकारण चांगलेच तापले आहे. या विषयावर कोमलताई साळुंखे यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, इतिहासातली मढी उकरुन काढण्याची खोड वाईटच आहे. गेली 35-40 वर्ष हिंदू-मुस्लीम धर्मांधता पेटती ठेवण्यासाठी जुनी पुराणी मढी उकरून त्याभोवती देशाचं राजकारण सत्तेसाठी पिंगा घालण्यात दंग आहे. त्यात आता औरंगजेबाच्या कबरीची भर पडली आहे.

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हयात असेपर्यंत औरंगजेबानं दख्खनमध्ये पाऊल ठेवण्याचं धाडस केलं नाही. कारण त्याला भीती होती की आपण माघारी जाऊ शकणार नाही. शिवरायांच्या निधनानंतर दोन वर्षांनी तो स्वतः पाच लाख सैन्यांसह दख्खनेत आला. पण त्याची गाठ छत्रपती संभाजी महाराज नावाच्या छाव्याशी पडली. संभाजीराजांनी न थकता सतत नऊ वर्षे मोगल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रुविरुद्ध निकराचा लढा दिला. मोघल फौजांना, साक्षात औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. मराठा साम्राज्य जिंकण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळवलं. याच द्वेषातून औरंगजेबानं संभाजीराजांना अतोनात हाल करुन कपटानं मारलं. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर ताराराणी आणि त्यांच्या मावळ्यांनी औरंगजेबला 'कबरी'त घालण्याचं ऐतिहासिक कार्य केलं. पण त्यांनी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची 'कबर' होऊ दिली. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवला!

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानच्या मृत्यूनंतर त्याच्यावर इस्लामी पध्दतीने अंत्यसंस्कार करुन त्याची कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. ही आहे महाराजांची सहिष्णुवृत्ती. शत्रू जर युद्धात मारला गेला तर त्याचा अंत्यविधी सन्मानाने ही शिवाजी महाराजांनी देशाला दिलेली एक शिकवण आहे. ही शिकवण आपण विसरलोय का, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगजेबाने आपल्या इच्छापत्रात 'मृत्यूनंतर माझी कबर माझे गुरु सैय्यद मैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी असावी. ती मी स्वतः कमावलेल्या पैशातच बांधावी. त्यावर एक मोगऱ्याचं छोट रोपटं लावावं, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार खुलताबादला गुरु सैय्यद झैझेनुद्दीन सिराजी यांच्या कबरीशेजारी औरंगजेबची कबर बांधण्यात आली. 1904-05 च्या दरम्यान लॉर्ड कर्झनला ह्या कबरीची माहिती समजली. 1659 ते 1707 इतका काळ दिल्लीचा बादशहा असलेल्याची कबर इतकी साधी कशी काय असू शकते?' असं वाटल्याने त्याने कबरीभोवती मार्बल ग्रिल बसवून थोडी सजावट केली. हा इतिहास आहे. इतिहासातून बोध घेऊन पुढे जाणे अपेक्षित असते. मात्र इतिहासाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणे हे देशहिताचे नाही.

मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, दोन्ही छत्रपतींचा लढा हा धार्मिक नव्हता तर राजकीय होता. ते कधीही कोणाशी धार्मिक द्वेषाने वागले नाहीत. दिलेरखानाचा भाऊ मिरबातखान हा संभाजीराजांचा शेवटापर्यंत जिवलग मित्र होता. शिवरायांच्या सैन्यात प्रमुख पदांवर मुस्लीम होते. सर्व जातीधर्मीयांवर त्यांनी मनापासून प्रेम केले. त्यांना शासनात संधी दिली.

आज शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहासातील हिंदू-मुस्लीम वाद पेटविण्यामागचा उद्देश नेमका काय आहे? कुणी म्हणतंय शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच. कुणी म्हणतंय अफजलखानाची कबर उद्ध्वस्त करा, कुणी म्हणतंय औरंगजेबाची कबर पाडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण असे कृत्य करण्यास आपल्याला परवानगी देते का, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण शिवरायांनी समाज जोडण्याची शिकवण दिली आहे, तोडण्याची नाही. आपला देश तरुणांचा देश आहे. पण आजची तरुणपिढी व्यसनाधिनतेच्या आहारी चालली आहे. त्यांच्या हाताला काम नाही. पैसा मिळविण्यासाठी गुन्हेगारी वाढत चालली आहे. नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या तरुणपिढीची माथी भडकावून त्यांचा वापर जातीय दंगली घडविण्यासाठी होऊ शकतो, याचे भान छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी राखले पाहिजे.

लाल किल्ला हे मुघल साम्राज्याचे प्रतीक आहे. ताजमहाल बांधणाऱ्या शाहजहाननेच 1648 मध्ये हा किल्ला बांधला. 15 ऑगस्ट 1947 रोजी येथे भारताचा ध्वज फडकविण्यात आला आणि हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक बनले. उद्या आपली मुलं म्हणतील लाल किल्ला पाडा. इतिहास पुसण्याचे काम करणार आहोत का आपण? असा प्रश्न उपस्थित करुन त्या पुढे म्हणाल्या की, सातत्यानं मंदिर-मशिदीच्या जागांवरून, कबरीवरुन वाद होणं चांगलं नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या काळात देशाची प्रगती चांगली होते. भावनिक मुद्यांना जेव्हा महत्व येतं, तेव्हा लोकांचे मूलभूत प्रश्न मागं पडतात. इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगताना ते प्रगतीच्या गळ्यातील लोढणं होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. सामोपचार आणि सामंजस्यानं ऐतिहासिक वादावर तोडगा काढला पाहिजे. माथी भडकावून, धार्मिक अहंकार फुलवून काहीच साध्य होणार नाही, असे मत शेवटी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केले.