Advertisement
मुंबई : समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे.औरंगजेब एक महान राजा होता. त्याच्या काळात भारतात सुवर्णकाळ होता, असे विधान अबू आझमी यांनी केलंय. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान अबू आझमी यांच्या विधानावर सर्वपक्षीय नेत्यांकडून टीका केली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी यांच्या अटकेची मागणी केली आहे.
अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले आहे. हा महाराजांचा अपमान आहे. अबू आझमी यांनी जे काही म्हटलंय ते महाराजांविरुद्ध आहे. त्यांच्यावर खटला चालायला हवा. पण तो कधी चालणार? कारण इथे भाजप सरकार आहे, असे ठाकरे म्हणाले.
अबू आझमींनी छावा सिनेमा पाहावा- राम कदम
दरम्यान, अबू आझमी यांच्या विधानावर भाजप नेते राम कदम यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. अबू अझीम आझमी यांनी थिएटरमध्ये जाऊन छावा हा चित्रपट पाहावा. तुम्ही इतिहास वाचलाच पाहिजे. ज्याला ते महान राजा म्हणत आहेत, त्याने आपल्या संभाजी राजांना इतक्या क्रूरपणे मारले. संभाजी राजांना त्याने तुरुंगात टाकले. अबू आझमींना लाज वाटली पाहिजे, असे राम कदम म्हणाले.
अबू आझमींकडून यापूर्वीही औरंगजेबाचे समर्थन
अबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन करण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही औरंगजेबाचे समर्थन केले आहे. 2023 मध्ये औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. धमकीनंतर त्यांनी त्यावेळी मुंबईतील कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता.जो औरंगजेबाचा उदात्तीकरण करत असेल त्याच्या विरोधात राजगृहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अबू आझमी जर असं बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले.
