Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक मोठा धक्का दिला आहे. 'मित्र' संस्थेच्या उपाध्यक्षपदी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच मित्र संस्था आणि या नव्या नियुक्ती चर्चेत आहेत. एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जाणारे बांधकाम व्यवसायिक अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखण्यात आला असून त्यांची 'मित्र' संस्थेच्या उपाध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील संस्थेचे नवे उपाध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं आहे.
केंद्रातील नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीने मित्र नावाची स्थापना करण्यात आली. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात स्थापन झालेल्या या संस्थेत उपाध्यक्ष म्हणून शिंदेंचे निकटवर्तीय समजले जाणारे विकासक अजय आशर यांची नेमणूक करण्यात आली होती. ही संस्था महाराष्ट्रातील थिंक टँक आहे असं म्हणता येईल.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाने अजय आशर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना आशर हेच निर्णय घेत असल्याचे आरोप भाजपने केले होते. मात्र, शिंदेंनी मुख्यमंत्री होताच आशर यांना हे महत्त्वाचे पद दिल्याने महाविकास आघाडीकडून भाजपवर टीका करण्यात आली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आशर यांना डावलून त्यांची जागा भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे.
