Advertisement
वर्धा येथे जिल्हास्तरीय बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
वर्धा : शासनाच्या परिपत्रकानुसार शासन निर्णय क्रमांक प्रआयो २०१७/प्र.क्र.३४८/ योजना १० दि. १६ फेब्रुवारी २०१८ परिपत्रकानुसार शासनाच्या जागेवर घर बांधून राहणाऱ्यांना (आठ अ) आणि (नमुना नवु) घेऊन जिल्ह्यातील सर्व बेघरांना कायम करण्यात आले पाहिजे, तेंव्हाच त्यांना शासनाच्या घरकुलांचा योजनेचा लाभ मिळेल. याकरीता जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील पाच आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करावे लागेल, असे बहुजन रयत परिषदेचे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे स्पष्ट केले.
वर्धा जिल्हास्तरीय बहुजन रयत परिषदेच्या सर्व पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांच्या सभेचे आयोजन अण्णा भाऊ साठे सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरून अजय डोंगरे बोलत होते. यावेळी बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडी अध्यक्षा हिराताई खडसे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर वाघमारे. नारायण जी. आमटे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष डोंगरे म्हणाले की. संघटनेचे ध्येय धोरणात्मक भूमिका समाजवून घेणे गरजेचे आहे. दिनांक ९/३/२०२५ ला पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या सभेतील विषयाबाबतही डोंगरे यांनी कार्यकर्त्यांसमोर सविस्तर माहिती सांगितली. तसेच, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे डोंगरे यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे महापुरुषाला भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, वस्ताद लहुजी साळवे अभ्यास आयोगांनी केलेल्या शिफारशींच्या योजनेत महाराष्ट्र शासनाने त्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. डॉ, अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्र, प्रशिक्षण देणाऱ्या (आर्टि) संस्थेस मान्यता देऊन स्वतंत्र निधी देण्यात यावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजनेत एक हजार कोटींचा निधी देऊन जामीनदाराची अटी रद्द करण्यात यावी, बँड कलाकारांना कलवंतांचा दर्जा देण्यात यावा तसेच वयोवृध्द कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशा अनेक मुद्यावंर अजय डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना मुद्देसुद सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
शासनासमोर या सर्व प्रश्नांना घेऊन लवकरच जिल्ह्यातील पाचही आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे महिला आघाडीच्या हिराताई खडसे यांनी सांगितले. शासनाने सहकार्य केले नाही तर बहुजन रयत परिषदेच्या वतीननेसामान्य जनतेसाठी तीव्र आंदोलन केले पाहिजे, असे मत किशोर वाघमारे यांनी मांडले. देवळी तालुका अध्यक्ष विनोद आमटे, वर्धा तालुका अध्यक्ष प्रशांत डोंगरे,आर्वी तालुका अध्यक्ष सुभाष सरकटे, कारंजा तालुका अध्यक्ष कैलास तायवाडे यांच्यासह कैलास मुंगले, सुनील पोटफोडे, सुधाकर डोंगरे आशिष बावणे, अतुल खंदारे, विक्की वाघमारे, एम. एस. डोंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
