Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची माहिती : अनुसूचित जात आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी
सोलापूर : अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाज (राज्यस्तरीय) यांच्या वतीने पाच लाख समाज बांधवांसह मंगळवार, ता. २० मे या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने ता. १ ऑगस्ट २०२४ रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत निर्णय दिला आहे. अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या अंतर्गत राज्य सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकते, असे न्यायालयाने या निर्णयात म्हंटले आहे. ७५ वर्षात महाराष्ट्रात मातंग आणि इतर तत्सम दलित जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. आरक्षण वर्गीकरण संदर्भात महायुती सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग १५ ऑक्टोबर २०२४ रोजी नेमला आहे. अद्याप या आयोगाने अहवाल सादर केला नाही. अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ, ब, क, ड किंवा अ, ब, क किंवा समितीच्या मताप्रमाणे निश्चित प्रारूप तयार करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. न्यायिक समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी. तेलंगणा राज्याने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरीच्या सोयी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा आहे. या पत्रकार परिषदेस सुरेश पाटोळे, सुधाकर पाटोळे, महादेव भोसले, समाधान आवळे, देविदास कसबे आदी उपस्थित होते.