Advertisement
मुंबई : देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. परिणामी यामुळं अनेक सेवा प्रभावित झाल्या. यामध्ये हवाई वाहतुकीचाही समावेश होता. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर भारतात बुधवार, 7 मे 2025 रोजी साधारण 7, 430 उड्डाणं रद्द करण्यात आली होती. देशातील उत्तर, पश्चिमी आणि मध्य क्षेत्रात असणाऱ्या विमानळांना याचा फटका बसला. तर, गुरुवारीसुद्धा या परिस्थितीत फारशी सुधारणा दिसली नाही.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही 8 मे 2025 रोजी 6 तासांसाठी बंद राहील असं वृत्त विमानतळ प्रबंधकांकडून समोर आलं. इथं विमानतळाचा रनवे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत देखभालीच्या कामासाठी बंद राहणार असून प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचं पूर्वनियोजन करावं आणि विमानाच्या बदललेल्या वेळांवर लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात आलं. रनवेची मान्सूनपूर्व देखभाल करण्यासाठी म्हणून हे काम हाती घेण्यात आलं असून, तिथं देशभरात सतर्कता म्हणून काही विमानतळं बंद असल्यानं मुंबईतही याच कारणानं विमानतळ बंद ठेवण्यात आल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र लगेचच त्यामागचं प्रत्यक्ष कारणही समोर आलं.
कोणकोणती विमानतळं बंद?
नगर, जम्मू, लेह, चंदीगड, अमृतसर, लुधियाना, पतियाला, भटिंडा, हळवारा, पठाणकोट, भुंतर, शिमला, गगल, धर्मशाला, किशनगढ, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केसोड, भुज, ग्वाल्हेर आणि हिंडन ही विमानतळं शासकीय आदेशानंतर बंद ठेवण्यात येत असून काही विमानतळं फक्त लष्करी सेवांसाठीच सुरू राहतील. तर, चार्टर्ड सेवांची विमानतळंसुद्धा बंद राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
