Advertisement
दिल्ली : देश संकटात असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या या एका फोटोची देशातच नाही तर पाकिस्तान सुद्धा चर्चा सुरू आहे. या फोटोतून अनेक संदेश जगाला गेले आहेत. नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात आले आहे. आतापर्यंत अनेक मुद्यांवर विरोधक आणि केंद्र सरकारमधील बेबनाव, सूडाचे राजकारण समोर आले. पण पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांच्या भूमिकेने अनेकांची मनं जिंकली. सर्व पक्षीय नेत्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारला एकमताने पाठिंबा दिला. इतकेच नाहीतर केंद्र सरकारच्या कारवाईला आढेवेढे न घेता पाठिंबा जाहीर केला. देश संकटात असताना सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी दाखवलेला सामंजस्यपणा हे नवीन भारताचे सुखद चित्र आहे.
सर्वपक्षीय बैठकीनंतरचा हा फोटो आहे. यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी एकत्र दिसत आहेत. खरगे यांनी राजनाथ सिंह यांचा हातात हात घेतला आहे. त्यांच्यात काहीतरी संवाद सुरू आहे. तर राहुल गांधी या भावस्पर्शी सोहळ्याचे साक्षीदार ठरले आहेत. तर त्यांच्या पाठीमागे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर कोणत्यातरी विषयावर हितगुज करताना दिसत आहेत. या फोटोची आज माध्यमातच नाही तर सोशल मीडियावर पण जोरदार चर्चा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांनी घेतलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या खमक्या भूमिकेला भारतीय विरोधी पक्षांनी एका सुरात पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट दिसून आली. मोदींच्या राष्ट्रहिताच्या आवाहनाला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे.
