Advertisement
दिल्ली : भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून एका अर्थी पाकिस्तनातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. भारतीय सैन्यदल आणि वायुदलाच्या संयुक्त प्रयत्नांनी झालेल्या या हल्ल्यामध्ये देशानं कशा प्रकारे पहलगाम हल्ल्याचं सडेतोड उत्तर दिले, याबाबतचा शब्दन् शब्द अतिशय परखड स्वरात सैन्यदलाच्या वतीनं एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सैन्यदलाच्या वतीनं लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी, वायुदलाच्या वतीनं विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितला. 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्तानं भारतीय लष्कर आणि सरकारनंही नारीशक्तीचा मास्टर स्ट्रोक मारत दोन महिला अधिकाऱ्यांवर या मोहिमेची संक्षिप्त माहिती देण्याची जबाबदारी दिली.
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घेण्यात आली इथपासून ते अगदी कोणते तळ या हल्ल्यात उध्वस्त करण्यात आले इथपर्यंतची माहिती कर्नल कुरेशी यांनी अधिक स्पष्ट भाषेत दिली आणि त्यांच्या या वक्तव्यातून पाकिस्तानलाही धडकी भरली असावी. सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल या पदावर सेवेत असून, सध्या त्या सिग्नल कोर या विभागात सेवा देतात. भारतीय सैन्यदलातील त्या अशा पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांनी सैन्यदलाच्या 'एक्सरसाईज फोर्स 18' या प्रशिक्षण मोहिमेचं नेतृत्त्वं केलं. दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या संघांचा या मोहिमेत सहभाग होता.
कर्नल कुरेशी मुळच्या गुजरातच्या रहिवासी असून, उपलब्ध माहितीनुसार त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शॉर्ट सर्विस कमिशनअंतर्गत त्या 1999 पासून भारतीय सैन्यदलात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांचं वय अवघे 17 वर्षे इतकं होतं. लष्करी सेवेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला असून, त्यांचे आजोबाही सैन्याच्या सेवेत होते असं म्हटलं जातं. सोफिका कुरेशी यांचे पती मॅकेनाईज्ड इन्फेंट्रीमध्ये आर्मी ऑफिसर असल्याचं सांगण्यात येते.
