Advertisement
पुणे : वैष्णवी हगवने हिने 16 मे रोजी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिचा पती, सासू आणि नंदण यांना लगेचच अटक केली होती. मात्र तिचा दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे हा फरार होता. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. दरम्यान आता त्यांना मदत करणं पाच जणांना चांगलंच भोवलं आहे, राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला ज्यांनी -ज्यांनी मदत केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगांव दाभाडे येथील मोहन भेगडे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या पाचही जणांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे हा तिचा मृतदेह पाहण्यासाठी आपल्या काही कार्यकर्त्यांसह रुग्णालयात आला होता, मात्र गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली, दरम्यान तो फरार असताना ज्यांनी -ज्यांनी त्याला मदत केली, त्या सर्वांवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे, या प्रकरणात आणखी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.