Advertisement
वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक
पुणे : एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केलं तर त्याचा अजित पवार काय संबंध?" असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन टीका करणाऱ्यांना सवाल केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्या केल्यानंतर अजित पवारांचे काही जुने फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी रोखठोकपणे आपली भूमिका आज बारामती दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणामध्ये मांडली.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात समजल्यानंतर आपण तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले, असंही अजित पवार म्हणाले. "मला कळताच पोलिसांना सांगितले ऍक्शन घ्या. सगळे अटकेत आहेत सासरा पळून गेला. पळून पळून जातो कुठं?" असा सवाल करत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच या प्रकरणाशी आपलं नाव जोडलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी थेट जाब विचारला. "यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकावा," असंही अजित पवार म्हणाले. गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आयुक्तांना सांगितले कारवाई झाली पाहिजे. माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोक माझ्या पक्षात नको. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो होतो," असं अजित पवारांनी सांगितलं. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून, जबाबदारी म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही केलं आहे. अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष यात माझी काय चूक?" असा थेट सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
कारच्या चावी संदर्भातही स्पष्टीकरण
वैष्णवीच्या लग्नामध्ये हगवणे कुटुंबाला भेट म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्ते देण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाला असून या फोटोसंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले,मागितली की मनापासून दिली" असं अजित पवार म्हणाले. "माझी का बदनामी करता?" असा सवाल अजित पवारांनी विरोधकांना विचारला आहे.