Advertisement
दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी भारत-पाकिस्तान सीमेजवळील भूज एअरबेसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एका कडक शब्दात इशारा दिला. भूजमध्ये त्यांनी उपस्थित असलेल्या हवाई योद्ध्यांशी संवाद साधला. भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानीमधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर योग्य उत्तर दिले. राजनाथ सिंह यांनी पुन्हा पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की, 'हा फक्त ट्रेलर होता, संपूर्ण पिक्चर अजून येणे बाकी आहे'.
राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात भूजच्या शौर्यगाथेची आठवण करून दिली आणि म्हणाले, "1965 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे हे भूज साक्षीदार राहिले आहे. 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे हे भूज साक्षीदार राहिले आहे. आणि आज पुन्हा एकदा, हे भूज पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे साक्षीदार बनले आहे." त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि पहलगाममध्ये अलीकडेच मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांनाही श्रद्धांजली वाहिली.