Advertisement
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणी आज हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरच संशय घेतला. वैष्णवीच्या चॅटमधील व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे. ती कोणाशी तरी चॅट करत होती. कदातिच तिने त्या व्यक्तीबरोबर वाद झाला असेल म्हणून आत्महत्या केली असेल असा दावा वकिलाने केला आहे. दरम्यान पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी कुटुंबाची बाजू मांडताना सरकारी वकील यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, तपास योग्य दिशेन चालू आहे. अटक आरोपींचे मोबाईल तपासणी करायची आहे. त्यात काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वैष्णीवीचे सोने कुठे गहाण ठेवलें आहे आणि किती ठेवले आहे याची तपासणी करायची आहे. पती, सासू आणि नणंद यांना 1दिवसांची पोलीस कोठडीची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती.
हगवणेंच्या वकिलाने म्हटलं की, वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
दरम्यान यावेळी वकिलाने बायकोला कानाखाली मारणं छळ नाही असा अजब युक्तिवाद केला. एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही, असा युक्तिवाद त्याने वैष्णवीच्या अंगावरील व्रणांसदर्भात बोलताना केला.