Advertisement
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा आरोप ; लाडकी बहिण योजनेसाठी वापर
सोलापूर : लाडक्या बहीण योजनेसाठीचा मे महिन्यातील हप्त्याचे नियोजन करण्याकरिता आदिवासी समाज कल्याण समितीचा निधी शासनाने वळविल्याने आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्याा निडणुकीत असा निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांच्या उमेदवारांना आडवे करा, असे आवाहन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले आहे.
आदिवासी समाज कल्याणचा निधी मिळविण्याकरीता 29 अनुसूचित जाती-जमातीतील आमदारांवर सरकारकडून दबाव आणल्याचेही ढोबळे यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे समाजाचा निधी वळविण्याचे काम करणाऱ्या मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आडवे करा, असे आवाहनही ढोबळे यांनी केले.
जे मलुल आहेत, गरीब आहेत अशा आदिवासी आमदारांवर दबाव टाकण्याचे काम सरकारमधील मंत्र्यांनी केले आहे. ज्यांना अशा काही सवलती बद्दल माहितीही नाही अशा समाजाचा निधी वळविण्याचे धाडस जर सरकार करीत असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मतांच्या ठोक्या गणिक दलितांचा निधी वळविणाऱ्या मंत्र्यांच्या लोकांना आडवं केलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
राज्य शासनाचा अर्थसंकल्प दोन महिन्यापूर्वीच मांडण्यात आला त्यातील अनेक योजना कागदोपत्री मोठ्या दिसत असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी शासनाकडे तेवढ्या प्रमाणात निधी आहे का, असा प्रश्न अनेक अर्थतज्ञांनी उपस्थित केला होता. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेवर निधी कसा देणार, याबाबत न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर विचार करता आदिवासी समाजासारख्या लोकांच्या तोंडाचा घास काढून तो निधी इतर ठिकाणी वळविण्याचा उद्योग राज्य शासनातील काही मंत्री करीत आहेत. समाजातील आमदारांवर दबाव आणत आहेत. आदिवासी समाज कल्याणचा निधी इतर ठिकाणी वळवून तो दुसऱ्या योजना करीता वापरत गरिबांवर अन्याय केला जात आहे, केवळ मतांवर डोळा ठेवून असा निधी दुसरीकडे वापरणे योग्य नाही त्यामुळेच आगामी निवडणुकात अशा मंत्र्यांच्या उमेदवारांना आडवं करण्याचे आवाहन मी महाराष्ट्रातील आदिवासी समाज बांधवांना करीत आहे, असेही माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी म्हटले आहे.