Advertisement
दिल्ली : भारताकडून पाकिस्तावर प्रत्युत्तराचा मारा सुरु असतानचा एकाएकी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यं वृत्त समोर आलं आणि युद्धाला विराम मिळाला. मात्र भारताचा दहशतवादाविरोधातील लढा इथंच संपला नाही असंच लष्करानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केलं आणि त्यानुसारच आता पाकवर पुन्हा एकदा भारताकडून आणखी एक स्ट्राईक करण्यात आला आहे. तिथं पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना ताब्यात घेतल्यानंतर आता भारत सरकारनं राजकीय स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तानची कोंडी करत देशात असणाऱ्या शेजारी राष्ट्राच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बाहेरची वाट दाखवली आहे. सदर अधिकाऱ्यांना देशविरोधी कृत्यांसाठी दोषी धरत त्यांना 'पर्सोना नॉन ग्रेटा' घोषित करण्यात आलं आहे. पंजाबमधील दोन सक्रिय हेराना आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप या राजनैतिक अधिकाऱ्यांवर करत भारतानं त्यांना 24 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयानं नुकतंच यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी करत सदर अधिकारी दिल्लीस्थित पाकिस्तानातील उच्चायोग कार्यालयात कार्यरत असल्याचं सांगितलं. सदर अधिकारी या कार्यालयात सेवेत असतानाही त्यांची कार्यपद्धती मात्र राजनैतिक तत्त्वांना अनुसरून नव्हती ज्यामुळं भारतानं त्यांना 24 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश दिल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पाकिस्तान उच्चायोगाच्या कार्यवाहक उच्चायुक्तांनाही यासंदर्भातील औपचारिक सूचना देण्यात आली आहे.