#

Advertisement

Thursday, May 22, 2025, May 22, 2025 WIB
Last Updated 2025-05-22T13:35:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

स्त्रीची लढाई तेव्हाच संपेल, जेंव्हा...

Advertisement

ऍड. कोमलताई  साळुंखे-ढोबळे यांनी नोंदविली मार्मिक शब्दांत प्रतिक्रिया 

पुणे : महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीने सहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली. हुंड्याची मागणी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आयुष्य संपविले. नऊ महिन्यांचे मूल मागे ठेऊन वैष्णवीने जगाचा निरोप घेतला. या प्रकरणामध्ये वैष्णवीचे सासरे फरार आहेत. तर, हगवणे कुटुंबातील अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन सर्वत्र संताप व्यक्त होत असताना बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मार्मिक शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. 

त्या म्हणतात की, घरगुती हिंसा, महिलांवरील अन्याय अत्याचार हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. आजही आपल्या समाजात स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ज्वलंत आहे. प्रगतीच्या, शिक्षणाच्या आणि जागरूकतेच्या अनेक गोष्टी बोलल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात घरगुती हिंसेचे प्रमाण वाढतेच आहे. सरासरी दर दोन घरांमागे एक घरगुती हिंसेचा बळी ठरतो. हे केवळ आकडे नाहीत तर हे अश्रू आहेत, हे विवंचना आहे स्त्रीत्वाची. 

ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमा जेव्हा यशस्वी होतात, तेव्हा संपूर्ण देश त्यात सहभागी झालेल्या अधिकारी सोफिया कुरेशी आणि व्योमीका सिंघ यांचे अभिनंदन करीत असतो. पण, त्याच वेळी, कुठेतरी आपल्या समाजातील एखादी मुलगी नवऱ्याच्या हातून, सासरच्या छळाने किंवा कधी आई-वडिलांच्या दुर्लक्षाने घरातच तुटत असते. एकीकडे देशासाठी लढणाऱ्या स्त्रिया आहेत, तर दुसरीकडे घरातच तुटणाऱ्या स्त्रिया आहेत. ही लढाई इतकी सूक्ष्म आणि न दिसणारी असते की ती फक्त भोगणाऱ्यालाच कळते.

महाभारतातील द्रौपदी, एक सामर्थ्यशाली स्त्री, ती एक राजपत्नी असूनही सभागृहात तिचे वस्त्रहरण होते आणि उपस्थित पांडव, गुरुवर्य आणि सगळी राजसत्ता फक्त बघत बसते. तिचे अपमानित होणे केवळ तिचे वैयक्तिक दुःख नव्हते, ती समाज व्यवस्थेची काळी बाजू होती. तिची लढाई बाहेरच्या शत्रूंशी नव्हती ती तिच्याच कुटुंबातील गप्प राहणाऱ्यांविरुद्ध होती. लंका दहन करणाऱ्या रामासाठी सीतेनं वनवास भोगला तरीही तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. कारण, समाज आणि कुटुंबाचा तिच्यावर विश्वासच नव्हता. ती बाहेरच्या शत्रूपासून वाचली, पण शेवटी समाजासमोर हरली.

देशद्रोह्यांविरुद्धची लढाई सोपी असते, पण जेव्हा लढाई आपल्या वडिलांविरुद्ध, पतीविरुद्ध, भावाविरुद्ध किंवा कधी आईच्या मौनाविरुद्ध असते तेव्हा ती लढाई मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर अधिक भयावह ठरते. कोणताही देश कोणावरही विजय मिळवू शकतो, पण जर त्या देशातील एक स्त्री आपल्या घरात सुरक्षित नसेल, तर ती खरी हार आहे. स्त्री ही फक्त पत्नी, आई, बहीण नव्हे तर ती एक शक्ती आहे. दुर्गा, चंडी, काली या सर्व देवतांची मूर्ती आपल्याकडे पूजली जाते, पण घरातलीच दुर्गा मात्र रोज अपमानित होते, वास्तव आहे.

घरगुती हिंसा म्हणजे केवळ शारीरिक मारहाण नव्हे. मानसिक त्रास, अपमान, आर्थिक नियंत्रण, जबरदस्तीचे निर्णय हे सगळेही त्यात येतात. घरगुती मॅटर म्हणून समाज  दुर्लक्ष करतो. स्त्रीला तूच सहन कर असं सांगून गप्प बसायला लावले जाते. पण प्रश्न हा आहे की, एक स्त्रीने सहन करायचं कुठपर्यंत? तिची लढाई कधी संपणार?

इतिहासात जशी झाशीची राणी होती, तशीच आजही अनेक सामान्य स्त्रिया आपल्या घरांतूनच क्रांती घडवत आहेत. त्या पोलिस ठाण्यात जातात, कोर्टात लढतात, मुलांना सांभाळतात आणि समाजाच्या नजरेत बंडखोर ठरतात. पण खरं तर त्या स्त्रिया आपल्या अस्तित्वासाठी, आत्मसन्मानासाठी लढतात. ही लढाई केवळ एकटीची नसून ती एकूण समाजाची आहे. कारण स्त्री जर सुरक्षित नसेल, तर समाज कधीच समतोल आणि सुसंस्कृत राहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आता मौन सोडावे लागेल. घरगुती हिंसेच्या प्रत्येक प्रकरणात उघडपणे आवाज उठवावा लागेल. पती-पत्नीचे भांडण म्हणून दुर्लक्ष न करता, योग्य मदतीसाठी पुढे येणं गरजेचे आहे. 

एक स्त्री जेव्हा आपल्या कुटुंबाविरुद्ध न्यायासाठी उभी राहते, तेव्हा ती केवळ स्वतःसाठी नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्ग निर्माण करीत असते. आज ऑपरेशन सिंदूर अशा मोहिमांचे कौतूक करताना, आपण आपल्या घरातील द्रौपदीचा आवाज ऐकण्याची आणि तिच्यापाठिशी एकत्र उभं राहण्याची गरज आहे. आज, हजारो द्रौपदींचे आवाज गप्प आहेत. आपण त्यांचा कृष्ण होणार आहोत की दुर्योधन, याचा विचार होणे गरजेचे आहे. स्त्रीची लढाई तेव्हाच संपेल, जेव्हा तिचे अस्तित्व सन्मानाने स्वीकारले जाईल. कर्तृत्ववान म्हणून, माणूस म्हणून, देवी म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून!