Advertisement
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हीने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ केला जात होता असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला आहे. आता तिचा शवविच्छेदन अहवाल ही समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ.जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा ही आढळल्या आहेत. शरीरावर रक्त साकाळल्याचे डाग आहेत. त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने आता तपास सुरू आहे.
वैष्णवी त्या घरात नरक यातना सहन करत होती. शिवाय तिने जाचाला कंटाळून या आधी ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ऐवढचं नाही तर ज्या वेळी ती गर्भवती होती त्यावेळी तिच्या चारित्र्यावर नवरा शशांक यानेच संशय घेतल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. वैष्णवी ऑगस्ट 2023 मध्ये गर्भवती राहीली होती. याची माहिती तिने पती शशांक याला दिली. पण त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे बाळ माझे नाही. ते दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे तो तिला म्हणाला. पती शशांक आणि सासरचे लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जेवणातून विष घेतले होते. त्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचं ठरवलं होतं.अशी धक्कादायक माहिती ही आता समोर आली आहे. तेव्हा तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे तिचा जीव वाचला होता. तिच्यावरती 4 दिवस उपचार सुरू होते. त्याकाळात तिला सासरचे कुणीही भेटण्यासाठी आले नाहीत, असे तिच्या घरच्यांनी म्हटले आहे.