Advertisement
मुबई : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली, या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. सरकारने त्रिभाषा सूत्रा संदर्भातील दोन्ही जीआर रद्द करतानाच शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, या समितीच्या अहवालानंतर आता त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, सरकारने जीआर रद्द करताच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला आहे. त्याचबरोबर हिंदी भाषा सक्तीविरोधात 5 जुलै रोजी जो मोर्चा निघणार होता, तो देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आली होती. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की, जरी मोर्चा रद्द झाला असला तरी देखील विजयी रॅली किंवा मेळावा निघेल त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून या मेळाव्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये ‘ ठरलं पाच जुलै मराठीचा विजयी मेळावा! ठाकरे येत आहेत…’ असा मजकूर छापण्यात आला आहे.