Advertisement
दिल्ली : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताने देश हादरला. त्यात 275 जणांना आपले प्राण गमवावे लागले. भारतीय सुरक्षा संस्था या अपघाताची चौकशी करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. उच्च गुप्तचर सूत्रांच्या मते, दुर्मिळ अशा दुहेरी इंजिन बिघाडाची घटना लक्षात घेऊन कटाच्या सात संभाव्य कोनांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंधन छेडछाड, सुरक्षा त्रुटी आणि तांत्रिक त्रुटी यासारख्या पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे. ही चौकशी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या धोरणावर आधारित आहे. जेणेकरून प्रत्येक संभाव्य धोका दूर करता येईल. CNN-News18 ने यासंदर्भात वृत्त दिल आहे.
12 जून रोजी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI 171 ने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले.पण पुढच्या 40 सेकंदात ते गर्दीच्या ठिकाणी कोसळले. या अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी फक्त एक ब्रिटिश-भारतीय प्रवासी वाचला. तो प्रवासी 11A क्रमांकाच्या सीटवर बसला होता. सुरुवातीच्या अहवालांमध्ये दुहेरी इंजिन बिघाड किंवा हायड्रॉलिक/इलेक्ट्रॉनिक सिस्टम बिघाड झाल्याचा संशय आहे.
काय आहेत 7 शक्यता?
अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा दिल्लीतील AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे आणि त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे. तपास संस्था 7 प्रमुख पैलूंवर लक्ष केंद्रित करत आहेत. पहिले, इंधन साखळीत छेडछाड होण्याची शक्यता, ज्यामध्ये विमानतळावरील इंधन पुरवठा किंवा गुणवत्तेत फेरफार समाविष्ट असू शकतो. दुसरे, सुरक्षा प्रोटोकॉलमधील त्रुटी, ज्यामध्ये बोर्डिंग प्रक्रियेत किंवा सामान तपासणीत निष्काळजीपणाचा संशय आहे. तिसरे सायबर हल्ल्याचा कोन, ज्यामध्ये विमानाची इलेक्ट्रॉनिक प्रणाली हॅक होण्याची शक्यता समाविष्ट आहे. चौथे तांत्रिक दोष, ज्यामध्ये इंजिन किंवा इतर भागांमधील उत्पादन दोषांची चौकशी केली जात आहे. पाचवे, अंतर्गत तोडफोड, ज्यामध्ये क्रू किंवा ग्राउंड स्टाफचा सहभाग तपासला जात आहे. सहावे, बाह्य दहशतवादी कट, ज्यामध्ये विमानाला लक्ष्य करण्याची योजना समाविष्ट असू शकते. सातवे, मानवी चूक, ज्यामध्ये पायलट किंवा नियंत्रण टॉवरची चूक तपासली जात आहे.