Advertisement
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याने विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच आता महाराष्ट्र शासन भिकारी असल्याचं कोकाटे यांनी म्हटल्याने टीकेचं लक्ष्य झाले आहेत. पिकविम्यासंदर्भात केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना त्यांची गल्लत झाली आणि महाराष्ट्र शासन भिकारी असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेतं. शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी शासन आहे, तर शेतकरी नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना हे विधान फार चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. "ते (कोकाटे) काय बोलले हे मी ऐकलं नाही. तथापि मला वाटतं की जर त्यांनी असं विधान केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. पीक विम्यासंदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धतही बदलली. कारण पीकविम्यात काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी, बहुतेक वर्षात कंपन्या अधिक फायदा घेत आहेत, यामुळे ती पद्धत बदलली. पद्धती बदलत असताना शेतकऱ्याला मदत करुच, पण त्यासह 5 हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीत गुंतवणूक करु असाही निर्णय घेतला. यावर्षीपासून आपण सुरुवात केली असून, 25 हजार कोटी रुपये पाच वर्षांत शेतीतील गुंतवणूक वाढवत आहोत. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.