Advertisement
दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
पुणे : केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत इयत्ता अकरावीच्या दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्यातील २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. या फेरीतही सर्वाधिक १ लाख २९ हजार ३५ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या प्रवेशालाच प्राधान्य दिले आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयात कॅप अंतर्गतच्या १७ लाख ६० हजार ९८ तर विविध कोट्याअंतर्गतच्या ३ लाख ७२ हजार ८६२ याप्रमाणे एकुण २१ लाख ३२ हजार ९६० एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात कॅपमध्ये ४ लाख ३१ हजार ६१५ तर कोट्यातील ७५ हजार ६७३ अशा एकुण ५ लाख ७ हजार २८८ प्रवेशाच्या जागा पहिल्या प्रवेश फेरीत निश्चित झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली.
प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीची कॅप प्रवेश यादी गुरुवारी (दि. १७) जाहीर करण्यात आली. या फेरीत जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह १८ ते २१ जुलै दरम्यान वाटप केलेल्या महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
दुसऱ्या फेरी अंतर्गत राज्यात विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. वाणिज्य शाखेच्या ६९ हजार ४४२ विद्यार्थ्यांना तर कला शाखेच्या ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.
- राज्यातील विभागांचा विचार करता पुणे - ४३७०२, अमरावती- २११०४, छत्रपती संभाजीनगर - २९३५८, कोल्हापूर- १८७६८, लातूर - १३६४०, मुंबई -७९४०३, नागपूर - २२०४४, नाशिक - २३७८९ याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी जाहीर झालेली आहे.
