Advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई : राज्यातील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मागील काही दिवसांपासून पु्न्हा नव्या वादात सापडले आहेत. अशातच आता या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाने खातेबदलाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेंकडील खातं मकरंद पाटील यांच्याकडे दिले जाण्याची दाट शक्यता आहे. मकरंद पाटलांकडे कृषी खातं सोपवण्यात आल्यास त्यांच्याकडील मदत व पुनर्वसन खाते माणिकराव कोकाटेंना दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. खातेबदल करून कोकाटेंवरील नाराजी कमी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. वादग्रस्त माणिकाराव कोकाटेंचे मंत्रिपद काढून न घेता त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना अभय दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढलेली आहे. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केले असल्याने लगेच त्यांचे मंत्रीपदावरून काढणे योग्य ठरणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत असल्याची माहिती समोर येत आहे.