Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकरला पुण्यातील एका रेव्ह पार्टीमधून अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात खेवलकरविरोधात धक्कादायक खुलासे झाले आहेत. बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, ज्यामुळे खेवलकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन काही मुद्दे उपस्थितीत केले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले. मुद्दा क्र. 1 ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे. मुद्दा क्र. 2 राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?
दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात त्यांनी कठोर पावले उचलली असून या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहित चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे पोलीस आयुक्तयांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी विरोधी पथक, सायबर विभाग यांचे मार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करावा लागणार आहे.