Advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी तयार केलेल्या पुस्तकातील कवितेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता दिसून येत आहे. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 28 वर आहे. तर दुसरीच्या पाठ्यपुस्तकात तीच कविता पान क्रमांक 16 वर आहे. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी कवितेचा मजकूर एकसमान आहे; केवळ त्यासोबतच्या चित्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कवितेची पुनरावृत्ती दोन्ही वर्गांमध्ये का झाली?, याबाबत बालभारतीकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. यामुळे पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये याबाबत नाराजी आणि गोंधळाचे वातावरण आहे.
‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात (पान क्रमांक 28) आणि दुसरीच्या पाठ्यपुस्तकात (पान क्रमांक 16) समाविष्ट आहे. यामागे बालभारतीचा काही शैक्षणिक हेतू आहे की ही चूक आहे, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) आणि सीबीएसईच्या धर्तीवर एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. ही कॉपी-पेस्टची चूक असावी, अशी चर्चा पालकांत आहे.