Advertisement
नाशिक : शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन हॉटेल एक्सप्रेस इन येथे करण्यात आले. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित असताना मोठा राडा झाला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेची आज उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक होती. बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत जिल्हा निहाय आढावा घेतला जाणार होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणूकसंदर्भातदेखील चर्चा होणार असल्याचे समोर आले होते. या बैठकीसाठी अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक विभागातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना अहिल्यानगरचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले बाबुशेठ टायरवाला यांच्यात वाद झाला. एकमेकांचे कार्यकर्तेदेखील बैठकीनंतर भिडल्याचे पाहायला मिळाले. दोन गट आपापसात भिडल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.