Advertisement
उमरगा : धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनाचा ताफा उमरगा येथे शुक्रवारी, (दि.८) सकाळी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. महसूल मंत्र्यांना शेतकरी कर्ज माफीसह इतर मागणीचे निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णा साहेब पवार यांनी ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पवार यांना ताब्यात घेतले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी महसूल मंत्री यांना ग्रामीण भागातील विविध संस्था, संघटना, महिला व नागरिकांनी विविध मागण्याचे निवेदन दिले. त्यानंतर महसूल मंत्री तुळजापूरला जाण्यासाठी निघाले. त्यांच्या वाहनाचा ताफा शहरात राष्ट्रीय महामार्गावरील तहसील कार्यालया समोर येताच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून पवार यांना ताब्यात घेत पोलीस वाहनातून ठाण्यात बसवले. महसूल मंत्री बावनकुळे यांचा ताफा निघून गेल्यानंतर काही वेळाने पोलीसांनी पवार यांना समज देऊन सोडून दिले.
