Advertisement
'लाडकी बहीण'च्या यशानंतर नवी योजना
ठाणे : विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'लाडकी सून' योजनेची घोषणा केली आहे. स्वत: एकनाथ शिंदेंनी या योजनेची घोषणा केली असून राज्यस्तरावर ही मोहीम राबवली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रविवारी शहरातील गडकरी रंगायतन येथे 'खेळ मंगळागौरीचा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित राहून आपण लाडक्या बहिणींशी संवाद साधल्याचं एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे. त्यासाठी 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन' हे अभियान हाती घेणार आहे, असं शिंदेंनी नमूद केले.
या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंनी, आपण अत्याचाराच्या घटना पाहतो. शिवसेना कायम आपल्या लाडक्या बहिणींसाठी उभी राहते. आम्ही लाडकी सून, सुरक्षित सून हे अभियान सुरु केलं आहे. लाडक्या सुनेचं संरक्षण हेच शिवसेनेचं वचन ही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी महिला आघाडीच्या रणरागिणी त्या ठिकाणी मदतीला पोहोचतील, असं सांगितलं. सध्या या योजनेअंतर्गत मदत हवी असल्यास 8828862288 आणि 8828892288 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच हेल्पलाइन नंबर, ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप ग्रुप सुरु होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले.