Advertisement
पुणे : मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी या विषयावर 'चलो मुंबई' चा नारा दिला आहे. लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जरांगे यांनी आता मुंबईच्या दिशेनं कुच केली आहे. त्यांच्या या आंदोलनाचे मॅनेजमेंट कोण सांभाळते हा एक चर्चेचा विषय आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अगदी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या राज्यातील पराभवात 'जरांगे फॅक्टर' देखील एक मोठं कारण होतं.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनले आहेत. पण, या आंदोलनात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत? याची फारशी कुणाला माहिती नाही. जरांगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी हे विश्वासू सहकारी सातत्यानं सांभळत आहेत. श्रीराम कुरणकर, दादासाहेब घाडगे, संजय कटारे, रमेश काळे, पांडुरंग तारख , गंगाधर काळकुटे, नारायण शिंदे, प्रदीपदादा सोळुंके अशी त्यांची नवे आहेत.