Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात नागपूरमधील पत्रकार परिषेदत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ते मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, असा दावा पवार यांनी केला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेआधी काही दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा बॉम्ब टाकून देशभरात खळबळ उडवली. तर त्यानंतर पवारांच्या या विधामुळे महाराष्ट्रातही हादरे बसलेच. त्यांच्या या विधानाची अद्याप सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.
शरद पवार ईडी कडे जसे स्वतःहून गेले तसंच या चौकशीला शरद पवार यांनी स्वत:हून सामोरं जावं असं बंब यांचं म्हणणं आहे. शरद पवार यांनी जो दाव केला होता, त्यानंतर बंब यांनी हे विधान करत पवारांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, त्यांच्याकडेही असेच लोक आले होते, दानवे यांनी त्यांना त्वरित पोलिसांच्या हवाली केलं. तसं शरद पवार यांनी दुसऱ्या रूममधून पोलिसांना फोन लावून त्या दोन लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं. मग त्यांनी तसं का केलं नाही ? असा सवाल बंब यांनी विचारला. मला वाटतं, त्यांची एक उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.