Advertisement
मुंबई : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांनी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं होतं. एका चुकीच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंनी बेस्ट पतपेढी 9 वर्षांची सत्ता हातातून गमावली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या पराभवाची धक्कादायके कारणे समोर आली आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. तर शशांक राव यांच्या पॅनलने मैदान मारले आहे. महायुतीच्या पॅनलला देखील या निवडणुकीत चांगलं यश मिळालंय. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव पॅनलला 12 जागा, प्रसाद लाड पॅनल - 09 तर, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला- 00 जागा मिळाल्या. 2016मध्ये BEST कर्मचारी सहकारी पतपेढीची शेवटची निवडणूक लढवण्यात आली होती. 2016 मध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळानेच आजवर कारकिर्द चालवली आहे.
दोन्ही ठाकरेंच्या पराभवाची धक्कादायक कारणे
1. बेस्ट कामगार सेनेच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेच्या एकत्रित उत्कर्ष पॅनलच्या प्रचाराकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची पाठ.
2. महापालिकेत अडिच दशके सत्तेत असतानाही कर्मचा-यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे भोवले.
3. ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढत असल्याने कामगार आपल्याला मतदान करतील आणि ठाकरे ब्रँडची हवा चालेल यावर दोन्ही कामगार सेना गाफिल राहिल्या.
4.दिलेल्या उमेदवारांपेकी काही उमेदवारांवरुन ठाकरेंच्या शिवसेनेत मतभेद होते वरिष्ठांना डावलून काही नेत्यांना उमेदवारी देण्यात आली.
5.महिला आरक्षित गटातील महिलेला ठाकरेंनी उमेदवारी दिली मात्र ती शिंदेच्या शिवसेनेत असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी वाढली.
6 अनेकांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याची चर्चा.
7 मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला मात्र ठाकरेंचा एकही वरिष्ठ नेता प्रचारात सहभागी झाला नाही.
8 ऐन निवडणुकीच्या काळात जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांची सुरु केलेली चौकशी.