Advertisement
मुंबई : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये खांदेपालट केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाने आपल्या नव्या मुंबई अध्यक्षांची घोषणा केली आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबईचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या आशिष शेलार यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं असून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
मुंबईच्या अध्यक्षपदावर भाजपाने अमित साटम यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवी शाल खांद्यावर टाक साटम यांच्याकडे ही नवी जबाबदारी सुपूर्द केली. साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. या सगळ्यामुळे भाजप नेतृत्त्वाने त्यांच्या खांद्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.