Advertisement
मुंबई : महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी 2011 ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकींमधील पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबईसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील, असं सांगण्यात आलं आहे.
याच वर्षी 6 मे रोजी सुप्रीम कोर्टाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र पावसाळा आणि सणासुदीमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे. डिसेंबर 2025 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. असं असेल तर दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होवून राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार असं सांगितलं जात आहे.
राज्य शासनाचं नियोजन कसं?
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर, तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले आहे. सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.