Advertisement
चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आंदोलनावर ठाम
मुंबई : शिंदे समितीसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. यादरम्यान त्यांनी वानखेडे स्टेडिअम मागितलं आहे. तसंच त्यांनी सरकारला वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. सातारा संस्थान आणि हैद्राबाद गॅझेटवर ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी उद्या 12 वाजेपर्यंत मला भेटायला यावे. अभ्यासक, तज्ज्ञ, वकील जे कुणी असेल त्यांनी यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच वानखेडे मैदान आम्हाला द्यावं अशी मागणी केली आहे.
आपण माजलेले नाही आणि मुंबईकर पण माजलेले नाहीत. सामान्यांना त्रास द्यायचा नाही, पोलिसांना त्रास द्यायचा नाही आणि फार झालं तर वानखेडे स्टेडियम उघडा झोपू द्या त्यांना. तिथं चेंडू खेळता, चेंडू हानाहानी पावसात बंद करा आमची पोरं झोपू द्या, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
शिंदे यांनी प्रक्रियेला वेळ लागतो असं सांगितलं असता, जरांगे यांनी वेळ का लागतो? असा प्रश्न विचारला. मनोज जरांगे यांनी म्हटलं की, "हैदराबाद गॅझेटनुसार उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. त्यावेळी नोंदणी करत आलेल्या लोकांची फक्त नोंदणी आहे, नाव आडनाव नाही. आता तेच मराठा आहेत. त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं. जे मराठे आहे तेच कुणबी आहे दुसरे कोणी नाही. गॅझेट आमचं आहे. बाकीच्या जातींना आरक्षण आहे. गॅझेट असं सांगते की मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे.
सरकारने यायला हवे होते मात्र शिंदे समिती आली. सातारा संस्थान गॅझेट, हैद्राबाद गॅझेट नुसार मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, तो आम्हाला लागू करा असं म्हटले, यात आम्ही 1 तासही वेळ देणार नाही. केसेस हटवा, बलिदान झालेल्या लोकांना मदत करा म्हणालो. चर्चा करून परत येतो म्हणाले, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.
मराठा कुणबी एक आहे. 58 लाख नोंदी आहे;. तात्काळ आरक्षण द्या म्हणालो. 2 महिन्याचा वेळ मागत होते, 58 लाख नोंदी आणि सगे सोयरे कायद्याबाबत वेळ द्या म्हणे. पाहिले 6 महिने मग 2 महिने मागितले. वेळ दिला नाही, 1 मिनिटंही नाही म्हणालो. मराठा कुणबी कायद्यासाठी वेळ नाही. ते आलेले आंदोलन मागे घ्या म्हणाले. 6 मुद्दे त्यांनी मांडले, असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.