Advertisement
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. दुसरीकडे मात्र ओबीसी नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला विरोध होत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी आता थेट जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटलांची मागणी बेकायदा आहे, असा आरोप यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे. शासनाने त्यांना फॅक्ट समजून सांगितलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात अराजक निर्माण होऊ शकते, असा इशाराही यावेळी हाके यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरागेंच्या मागणीचा अर्थ होतो. ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाल प्रति आंदोलन पुकारतील त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल, अशी घोषणाही यावेळी हाके यांनी केली आहे.
जरांगे कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभं करतील याचा नेम नाही. अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवली, जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविरोधात खालच्या स्थरावर टीका करत आहेत, मात्र तरी देखील सत्तेतील माणसं जरांगे पाटलांना रसद पुरवत आहेत. ओबीसीच्या मंत्र्यांनी गट निर्माण करून मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे, असंही यावेळी हाके यांनी म्हटलं आहे.