Advertisement
ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. लक्ष्मणराव ठोबळे यांचे प्रतिपादन
पन्हाळा : दलित, पीडित, कष्टकरी कामगार यांच्या व्यथा आणि त्या व्यथा लेखनातून जगाच्या पाठीवर पोहोचवणारे साहित्यरत्न, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त पन्हाळा तालुका साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला माजी मंत्री तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. लक्ष्मणराव ठोबळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ठोबळे यांनी आपल्या भाषणात अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट पक्षासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत, ज्यांना मोठं केलं, त्याच पक्षाने त्यांच्या विरोधात राजकारण केलं. ही एक शोकांतिका आहे, अशी खंत व्यक्त केली.
या वेळी अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी जोरदार मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. प्रा. ठोबळे म्हणाले की, शारदेच्या दरबारात मानाचा मुजरा करणारा,अक्षर वाङ्मयाचा निर्माता, २७ भाषांत नावलौकिक मिळवलेलं नेतृत्व म्हणजे अण्णा भाऊ साठे, त्यांना लोकांनी सन्मान दिला. पण, सरकारकडून अपेक्षित मान मिळालेला नाही. भारतरत्न मरणोत्तर दिला जात नाही, या कॅबिनेट ठरावामुळे हा विषय रखडलेला आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १० पटकथा, २४ कथासंग्रह आणि असंख्य लोकगीते व पोवाडे रचले. त्यांच्या लेखणीतून दलित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या जीवनातील व्यथा जगापर्यंत पोहोचल्या. रशियातील प्रवासादरम्यान तेथील सरकारने त्यांना गौरवले होते. मात्र, भारताने त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत या सोहळ्यात त्यांनी व्यक्त झाली.
या कार्यक्रमाला आमदार विनय कोरे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने आयोजित कवी संमेलनात महाराष्ट्रातील विद्रोही कवींनी सहभाग घेतला. शब्दांच्या धारेतून अण्णाभाऊंच्या विद्रोही आणि जनतेच्या मनात रुजलेल्या लेखनाला मानाचा मुजरा देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक दादासाहेब तांदळे यांनी अण्णा भाऊंच्या साहित्याच्या लोकजागृतीतील प्रभावाची जाणीव करून दिली.