Advertisement
शुल्क थेट विद्यापीठाच्या खात्यात जमा होणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आगामी शैक्षणिक वर्षापासून परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. या विद्यापीठाशी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयं संलग्न आहेत. त्यांना आगामी वर्षापासून 20 टक्के जास्त फी भरावी लागेल. विद्यापीठानं ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही फी भरण्यासाठी विद्यापीठानं थेट शुल्क भरणा प्रणाली देखील सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमार्फत शुल्क भरण्याऐवजी ते थेट विद्यापीठाच्या खात्यात जमा करावे लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ आणि व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार ही फी वाढ करण्यात आली आहे. 2018-20 या शैक्षणिक वर्षापासून दर दोन वर्षांनी परीक्षा शुल्कात 15 टक्के वाढ मंजूर करण्यात आली होती. पण, कोरोना व्हायरस आणि त्यानंतरच्या परिस्थितीमुळे, गेल्या सात वर्षांत कोणतीही फी वाढ लागू करण्यात आली नव्हती. प्रलंबित वाढ 55 टक्के असली तरी, विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून केवळ 20 टक्क्यांपर्यंतच वाढ मर्यादित ठेवली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले. विद्यापीठाने परीक्षा फी जमा करण्याच्या पद्धतीतही बदल केला आहे. "परीक्षा शुल्क प्रक्रियेत सुसंगतपणा यावा यासाठी, विद्यार्थी आता परीक्षा शुल्क थेट विद्यापीठाच्या खात्यात जमा करतील. शुल्क भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर दोन दिवसांच्या आत महाविद्यालयांचा वाटा त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल, असे डॉ. देसाई यांनी पुढे सांगितले.
