Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, ग्राम पंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या राजकीय पक्षाने निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
अरुण गवळी सक्रीय राजकारणात उतरणार नाहीत, पण त्यांची अखिल भारतीय सेना मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. अरूण गवळी यांची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवणार आहे. अरूण गवळी यांच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार आहे. अरूण गवळींची दुसरी मुलगी योगिता गवळीही पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. याअगोदर मुंबई महानगर पालिकेत अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे दोन नगरसेवक होते. यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहेत. वंदना गवळी यांच्या विरोधात देखील अखिल भारतीय सेनेचा उमेदवार देणार असल्याची माहिती गीता गवळी यांनी दिली.
1990 च्या दशकात मुंबई पोलिसांच्या वाढत्या दबावापासून आणि टोळीयुद्धांपासून वाचण्यासाठी अरुण गवळींनी राजकारणात प्रवेश केला. अरुण गवळींनी अखिल भारतीय सेना (ABS) नावाचा पक्ष स्थापन केला. 2004 मध्ये त्यांनी चिंचपोकळी येथून विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार झाले. 2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (MCOCA) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. तब्बल 18 वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची जेलमधून सुटका झाली.
