Advertisement
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान
चंद्रपूर : महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आणि 385 तालुके आहेत, तसेच मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही. हे जिल्हे 6 महसूल विभागांमध्ये विभागले आहेत. राज्यात 81 तालुके आणि सुमारे 20 जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे, जनगणना झाल्यावर भौगोलिक स्थिती पाहून निर्णय घेऊ, असे विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर दौऱ्यात केले आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 81 तालुके आणि सुमारे 20 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे असल्याचे सांगत जनगणना झाल्यावर जागांची पुनर्रचना लक्षात घेतल्यावर या संबंधात भौगोलिक परिस्थिती पाहून आवश्यक असेल त्या ठिकाणी निर्णय घेऊ असे सांगितले.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी राज्यात 26 जिल्हे होते. आतापर्यंत 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्हा ठाण्यातून स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. याच प्रमाणे आता नाशिकमधून मालेगाव अहमदनगरमधून शिर्डी, पुण्यातून बारामती, ठाण्यातून मीरा-भाईंदर आणि साताऱ्यातून कराड असे नविन जिल्हे निर्माण करणे प्रस्तावित आहे. तालुका निर्मितीचा निर्णय झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आराखडा तयार केला जातो. या आराखड्यावर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातात. सर्व हरकती आणि सूचनांचा विचार करून जिल्हाधिकारी आपला अंतिम अहवाल शासनाकडे पाठवतात, त्यानंतर शासन अंतिम निर्णय घेतला जातो.
