Advertisement
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडे धनंजय मुंडे यांची मागणी
रायगड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मीक कराड कनेक्शन उघड झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमावावे लागले. 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडे पक्षाने कोणतीच जबाबदारी दिलेली नाही. यामुळे धनंजय मुंडे अस्वस्थ झाले आहेत. आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.
रायगडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर जबाबदारी देण्याची मागणी केली. यावर योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिले आहे. रायगडमधील अर्जत पोलीस मैदानात सुनील तटकरेंचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी थेट तटकरे यांना गळ घातली. आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणीच धनंजय मुंडे तटकरे यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांनी मागणी ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या. तटकरेंनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आमचं चुकलं तर नक्कीच कान धरावा आणि नाही चुकलं तर ठिकच, तरीही चालतच, असे म्हणत धनंजय मुंडे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. भर सभेत धनंजय मुंडे अशा प्रकारे मागणी केल्याने तटकरे यांनी डोक्याला हात लावला.
