Advertisement
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनावरुन हायकोर्टाने खडसावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे. कोर्टाने मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आहेत, रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत त्या सर्व ठिकाणाहून आंदोलकांना उद्यापर्यंत हटवा. उद्या संध्याकाळी ४ पर्यंत ही कारवाई करा असा आदेश दिला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.
मी प्रवासात असल्याने कोर्टाने नेमकं काय म्हटलं हे ऐकलेलं नाही. जे समजलं आहे त्यानुसार कोर्टाने परवानगी देताना दिलेल्या अटी-शर्थी, तसंच रस्त्यावर जे सुरु आहे त्यासंदर्भात नाराजी जाहीर केली असून, काही निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या निर्देशाचं पालन करणं प्रशासनाला क्रमप्राप्त असून त्याचं पालन केलं जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. बैठकीत आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार केला. तसंच जिथे मार्ग काढता येऊ शकतात ते कायदेशीररित्या कोर्टात कसे टिकवू शकतो यासंदर्भातही चर्चा झाली. त्यातील अधिकची माहिती मागितली आहे. कायदेशीर मार्ग शक्य असल्यास काढण्याची आमची मानसिकता आहे, असंही ते म्हणाले.
कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर आता कडक कारवाई करावी लागेल. सरकारला आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार अहंकार ठेवत नाही. जो शक्य आहे तो मार्ग काढत आहोत. जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर होईल. कायदेतज्ज्ञांनी आणि सुप्रीम कोर्टाने हा केंद्राच्या नाही तर राज्याच्या अख्त्यारित असल्याचं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सुप्रियांसहित सर्वांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करावं, यामुळे आपलंच तोंड पोळतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा प्रश्न त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले आणि तोडगा कोणी काढला याचा विचार करायला हवा. अडीच वर्षं यांचं सरकार असताना मराठा समाजासंदर्भात एकही निर्णय घेतला नाही. याउलट आमचं सरकार असताना निर्णय झाले आहेत. त्यामुळे राजकीय पोळी भाजणं बंद केलं पाहिजे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी लगावला आहे.
