Advertisement
अॅड, कोमल ढोबळे-साळुंखे यांची कृष्णा खोरे महामंडळाकडे मागणी
मंगळवेढा : उजनी वसाहतीतील विश्रामगृह व सांस्कृतिक भवनची मोठी दुरवस्था झाली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे याकडे दुर्लक्ष असल्याने ही वस्तू धुळखात पडून आहे. परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगळवेढा बसस्थानकाजवळील उजनी वसाहतीमधील हे सांस्कृतिक भवन गरीब जनतेला कमी भाडे असल्याने परवडणारे होते. येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन, विवाह सोहळे होत होते. परंतु, अलिकडील काळात या भवनची मोठी दुरवस्था झाली आहे. सदर खात्याचे या दुर्लक्ष असल्याने वास्तू दुर्लक्षित झाली असून परिसर अस्वच्छ आहे. या इमारतीचा वापर सध्या गैरकृत्यांसाठी केला जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड, कोमल ढोबळे-साळुंखे म्हणाल्या की, उजनी परिसरात आमचे बालपण गेले आहे. उजनीचे कार्यालय, शासकीय विश्रामगृह आणि शेजारीच मंगल कार्यालय आहे. याच मंगल कार्यालयातून अनेकांनी वैवाहिक जीवनाची सुरूवात केली आहे. कमी भाडे असल्याने गोरगरिबांना लग्नकार्यासाठी या भवनचा मोठा आधार होता. या दोन्ही वास्तूंची अवस्था पाहिली की मन हेलावते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष, उदासीनता आणि बेफिकिरीमुळे या वस्तू उद्ध्वस्त अवस्थेत उभ्या आहेत. प्रशासनाने लक्ष देऊन दुरूस्ती केली, तर पुन्हा एकदा ती समाज जीवनाचं केंद्र बनून या ऐतिहासिक वास्तूला नवी झळाळी मिळेल. यासदंर्भात संबंधीत विभागाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवेढा बसस्थानक परिसरात पोलीस ठाणे, विविध शासकीय कार्यालय, नर्मदा पार्क, शिक्षक कॉलनीसह चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचा परिसर येत असून या भागातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमाला अन्य ठिकाणी जावे लागते. त्याचबरोबर या लगतच्या परिसरात असलेल्या विश्रामगृहांमध्ये बाहेरून आलेल्या शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांना बैठकीसाठी हे विश्रामगृह अतिशय सोयीचे होते. परंतु, काही वर्षांपासून विश्रामगृह नादुरूस्त झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मात्र, जि.प. व सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृह देखील सोयीपेक्षा गैरसोयीचे अधिक आहे. गैरसोयीमुळे मंगळवेढ्यास न आलेले बरे, अशी भावना अधिकारी व लोकप्रतिनिधी व्यक्त करतात. या वसाहतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाने याप्रश्नी लक्ष घालून या विश्रामगृह व सांस्कृतिक भवनच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून हे भवन सर्वसामान्यांसाठी खुले करावे, अशी मागणीही अॅड, कोमल ढोबळे साळुंखे यांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सचिन मन्त्रोळी यांच्याशी संपर्क साधला असता, विश्रामगृह लोकांना उपलब्ध करावे, अशी लोकांची मागणी पुढे येत असेल तर दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात पाठवण्यात येईल, असे सांगितले.
