Advertisement
प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या शासकीय अधिकार्यांना कानपिचक्या
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना समाजबांधवांपर्यंत योग्यरित्या पोहचत नसल्याने याबाबतचे निवेदन देण्यासाठी बहुजन रयत परिषदेची समिती मुंबई येथील मुख्य कार्यालयात गेली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी या मुख्य कार्यालयाची दुरवस्थाही अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देत चांगल्याच कानपिचक्या घेतल्या.
याबाबत प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा कार्यालय फलकच मोडकळीस आलेला आहे मर्यादित या शब्दांत केवळ (मया.) दर्शवित आहे तर त्यापुढील मुंबई या शब्दांतील इ हा शब्द मोडलेला आहे. ज्या शासकीय इमारतीत हे कार्यालय आहे त्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. मुख्य कार्यालयात जाण्यासाठीची लिफ्ट बंद पडलेली आहे, त्यामुळे जिना चढतच वरील मजल्यावर जावे लागते. यातून ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालयापर्यंत पोहचतानाच येथील अवस्था पाहून समाज बांधवांच्या आयुष्याची किती काळजी येथील शासकीय अधिकार्यांना असावी याची प्रचिती येते. मोडकळीस आलेली जुनाट कपाटे जाण्याच्या मार्गातच आडवी ठेवण्यात आली आहेत. त्यावरच कागदपत्रांची गठुडी, मोडक्या खुर्च्या टाकल्या आहेत. गुटखा, पान खाऊन खिडक्यांजवळ भिंतीवर थुंकल्याची चित्रं येथील अधिकारी आणि कर्मचार्यांची मानसिकता दर्शवितात. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीही कमालीची अस्वच्छता आहे. यातच कार्यालयात योजनांच्या कागदपत्रांची गठुडी अक्षरश: अस्ताव्यस्त पडली आहेत. समाजाच्या उत्कर्षाकरीता स्थापन करण्यात आलेल्या या कार्यालयाची अशी अवस्था असेल तर येथील अधिकार्यांकडून समाजबांधवांनी काय अपेक्षा करावी, असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी उपस्थित केला आहे.
व्यवस्थापक म्हणाले की...
विकास महामंडळासाठी इतरत्र सुसज्ज कार्यालय असावे याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच मांडण्यात आलेला आहे. परंतु, काही शासकीय अडचणींमुळे ते शक्य झालेले नाही. बहुजन रयत परिषदेकडून निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टींवर उपाययोजना केली जाईल, असे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे यांनी स्पष्ट सांगितले.
