Advertisement
मुंबई : नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संस्कृतमधून शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सीपी राधाकृष्ण उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्रातील राज्यपाल पदाची जबाबदारी आचार्य देवव्रत यांनी स्वीकारली आहे.
आचार्य देवव्रत यांना 2015 ऑगस्टमध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक मिळाली, जे त्यांचे पहिले राज्यपालपद होते. नंतर गुजरातची जबाबदारी सांभाळली. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठीही नाव चर्चेत होते. पण सीपी राधाकृष्ण यांना ती जबाबदारी मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी आचार्य देवव्रत यांच्याकडे गेली. त्यांचा प्रवास गुरुकुलप्रमुख ते राज्यपाल असा प्रवास आर्य समाजाच्या आदर्शांवर आधारित आहे.
डॉ. देवव्रत आचार्य यांचा जन्म 18 जानेवारी 1959 रोजी झाला. ते हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील समलखा तालुक्यातील पावचे रहिवाशी आहेत. लहरी सिंह कुटुंबातील देवव्रत ही एकूण 5 भावंडे आहेत. आचार्य देवव्रत यांच्यावर बालपणीपासून आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वतींच्या आदर्शांचा प्रभाव असल्याने त्यांचे जीवन शिक्षणाला वाहिले गेले.
डॉ. आचार्य यांनी 1978 मध्ये दयानंद ब्रह्म विद्यालयातून विद्या वाचस्पती (स्नातकोत्तर समकक्ष) पदवी मिळवली. 1982 मध्ये हरिद्वारच्या दयानंद महाविद्यालय ज्वालापूरमधून बीए (विद्या भास्कर), 1984 मध्ये पंजाब विद्यापीठ चंदीगडमधून पदव्युत्तर, 1991 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून बी.एड. पदवी प्राप्त केली. नंतर 1996 मध्ये इतिहासात एमए, २००० मध्ये योग विज्ञानात डिप्लोमा आणि 2002 मध्ये निसर्गोपचार व योगिक विज्ञानात पीएच.डी. केली.
