Advertisement
शरद पवार यांनी दिल्या लक्ष्मणराव ढोबळे यांना शुभेच्छा
सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे शिष्य आणि विश्वासू स्नेही म्हणून ज्यांची ओळख आहे, असे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या गुरूंची मान उंचावेल, असे काम वयाच्या 73व्या वर्षी केले आहे. त्यांनी साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर पीएचडी मिळवली आहे. शिक्षणाला वय नसते, माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो, अशी प्रतिक्रिया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या डॉक्टरेट पदवी प्रदान सोहळ्यात त्यांनी केले, त्यांचे राजकीय गुरू शरद पवार हे या वयातही पायाला भिंगरी लावून राज्यात फिरत असताना डॉक्टरेट पदवी मिळवून त्यांनी आपण पवार यांचेच शिष्य असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे कामाच्या व्यापातून वेळ काढीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छाही दिल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शुभेच्छा संदेश पाठविला.
याविषयी ‘लक्षवेधी’च्या प्रतिनिधीशी बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की. शिक्षण मिळवण्यासाठी कुठलेही वय नसते. शाहू शिक्षण संस्थेचा संस्थापक म्हणून अभ्यास करणार्या स्नातकाला आपण आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे, या हेतूने मी प्रथम कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रजिस्ट्रेशन केले, त्यानंतर सोलापूर विद्यापीठात पीएचडीसाठी रजिस्ट्रेशन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य लेखनाची वैशिष्ट्ये, असा माझा पीएचडीचा विषय होता. पीएचडी मिळविण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी गेला. चार वर्षांतच मला पीएचडीचा मिळाली असती परंतु, काही विरोधकांच्या वादात दोन वर्षे गेली. यामुळे सहा वर्षे अभ्यास करावा लागला. आपल्या खुमासदार शैलीत ढोबळे म्हणाले की, शारदेच्या दरबारात मानाचा मुजरा करीत उभे राहणं आणि दरबारी थाटात देखण्या अक्षराशी संगत करणे, हा माणसाचा स्थायीभाव असतो. त्यातूनच मी अभ्यास करीत गेलो, माझ्या कामाला गती मिळत गेली.
या संशोधनकामी सोलापुरातील डी.बी.एफ दयानंद व शास्त्र महाविद्यालयाती प्रा. देविदास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कन्या अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे सहकार्य लाभल्याचा लक्ष्मणराव ढोबळे यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी शाहू शिक्षण संस्थेचे जवळपास एक हजार कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.
