Advertisement
कोल्हापुर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी मविआची युती असेल असं नाही. स्थानिक समीकरणं पडताळून निर्णय घेतला जाईल असं शरद पवारांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू, असंही स्प्ट केलं. उद्धव आणि राज ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की, ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद आहे. मुंबई, ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही.
शिवसेना-मनसेच्या अपेक्षित युतीवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं. तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75 व्या वाढदिवानंतर राजकारण थांबवावं का? यावरही मत मांडलं आहे. माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी त्यावेळी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही, असंही शरद पवार सांगितलं. तसंच त्यांच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की, पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही. मी 75 वर्षानंतरही राजकारण करत आहे. कोणी निवृत्त व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं पवार म्हणाले.
