Advertisement
बहुजन रयत परिषदेची मागणी : संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदेन
मंगळवेढा : तालुक्यातील सर्वत्र दोन ते तीन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः सूर्यफुल, मका, कांदा, बाजरी, उडीद, तूर व इतर पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्त्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
याबाबत लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले की, तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके पाण्याखाली जाऊन नष्ट झाली आहेत. शेतकरी पूर्णतः हवालदील झाला आहे. या व्यतिरिक्त शेतीमध्ये अजुनही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रब्बी हंगामातील पेरणी व उत्पादनावरही परिणाम होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांची अडचण अधिकच गंभीर होऊन त्यांचा उदरनिर्वाह व जीवनमान धोक्यात आले आहे. सदर परिस्थिती ही एक नैसर्गिक अपत्ती असून यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. शेतकरी आजमितीस शासनाकडून मदतीची आपेक्षा बाळगून आहे. शासनाने तत्काळ ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी वर्ग ही राष्ट्राचे अन्नदाते असून त्यांचे अस्तित्व टिकणे हेच समाज व अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून तातडीने बाहेर काढणे व त्याच्या जगण्याला आधार देणे, हे शासनाचे प्रथम कर्तत्व असल्याचेही लक्ष्मणराव ढोबळे यांनी नमूद केले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात द्वारे मंगळवेढा तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये ओला दुष्काळ घोषित करावा, अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कोणतेही जाचक निकष न लावता सरसकट व विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लागणारी बियाणे, खते, ओषधे यासाठी विशेष आर्थिक मदत व सवलतीच्या योजना राबवाव्यात, बागायत पिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन अतिरिक्त नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा मिळावा यासाठी नुकसान भरपाई प्रस्ताव शासन स्तरावर विलंब न लावता मंजुर करण्यात यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी राहुल शहा, अनिल सावंत, चंद्रशेखर कौंडुभैरी, संतोष रंधवे, राजेंद्र चेळेकर, साहेबराव पवार, दादासाहेब भगरे, सुखदेव ठोरले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
