Advertisement
संजोग वाघेरे हे पुन्हा स्वगृही परतणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे वाघेरे यांच्या पक्षांतरची चर्चा जोर धरली आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजोग वाघेरे हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र, अद्याप याबद्दलची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पिंपरी-चिंचवडमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. या भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी शहरातील कार्यकर्त्यांशी आणि प्रमुख व्यक्तींशी संपर्क साधत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागावर पुन्हा एकदा मजबूत पकड मिळवण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे.
पार्थ पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान पार्थ पवार यांनी संजोग वाघेरे यांच्यासोबत भोजनही केले. ज्यामुळे वाघेरे लवकरच आपल्या जुन्या पक्षात परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
