Advertisement
तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतपिकांची केली पाहणी
मंगळवेढा : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा, उडीद, मूग, मका अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, प्रशासनाने अद्याप पंचनामे करण्याचे आदेश दिले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सदर बाब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना सांगितल्यानंतर ढोबळे यांनी स्थानिक शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांसह गणेशवाडी, शेलेवाडी, अंधळगावात या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून थेट तालुका कृषि अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत निर्देश दिले.
माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांना गेल्यावर्षी खरीप हंगाम उडीद पिकासाठी लाभदायक ठरला होता. त्यामुळे यावर्षी या भागात मोठ्या प्रमाणात उडीद व मूग पीक पेरण्यात आले होते. परंतु, पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी पिकांचे पंचनामे व्हावेत, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकरी आशा बाळगुन आहे. आज काही भागाची पाहणी करून कृषि अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलून शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे, असे ही ढोबळे यांनी सांगितले.
शेतकर्यांनी यावर्षी खरिपाच्या पेरण्या लवकर केल्या. तालुक्यात 40 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. उडीद 3680 हे., मूग 243 हे., कांदा 3500 हे., बाजरी 7300 हे., मका 11200 हे., तूर 7500 हे., भुईमूग 706 हे., सूर्यफूल 4000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली होती. 4 ऑगस्टपासून मंगळवेढा तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने ही पिके वाया गेली आहेत.
शेतकर्यांना या पिकातून बियाणे, मशागत, मजुरी याचे पैसेसुद्धा मिळणे कठीण झाले आहे, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, असे ही ढोबळे यांनी स्पष्ट केले. तालुका कृषी अधिकारी मनीषा जाधव सर्व मंडल अधिकारी व कृषी सहाय्यक यांना या पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

