Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मांडलेला मुद्दा योग्यच
मुंबई : अनुसुचीत जातीकरीताच्या आरक्षणाचे अ ब क ड नुसार वर्गीकरण व्हावे आणि त्यानुसार मातंग समाजाला योग्य आणि न्यायीक पद्धतीने आरक्षण मिळावे, अशी मागणी समाजाकडून होत आहे. ही त्यांची मागणी योग्य असल्याचे तसेच आरक्षणाच्या वर्गीकरणातून ज्यांना आवश्यक आहे, अशा जातींना समान न्याय मिळून त्यांना खर्या अर्थाने आरक्षणाचा लाभ होणार असल्याने आपला आरक्षण वर्गीकरणास पाठींबा असल्याचे वंचीत बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे स्पष्ट केल्याने एक प्रकारे आरक्षणाच्या वर्गीकरणाचा न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची भूमिका योग्य असल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.
आरक्षण वर्गीकरण या मुद्द्यावर बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे गेली काही वर्षे न्यायालयीन लढाई लढत आहे. अ ब क ड अशा वर्गीकरणातून मातंग समाजाला योग्य प्रमाणात आरक्षण मिळू शकते, याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच विषयासंदर्भात एका दूरचित्रवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी अनुसुचीत जातीच्या अ ब क ड वर्गीकरणाविषयी कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. महाराष्ट्रात मातंग समाजाची एकूण लोकसंख्या, त्यांची जीवनपद्धती, उद्योग-व्यवसाय, उपजीविकेची साधने कोणती, शेतजमीन आहे की नाही, शैक्षणिक, आर्थिक, समाजिक परिस्थिती, समाजापुढील महत्वाचे प्रश्न, शासकीय योजनेचे लाभार्थी किती? वार्षिक उत्पन्न किती? शासकीय नोकरीतील प्रमाण, राजकारणातील प्रतिनिधित्व हे सगळे मुद्दे अभ्यासपूर्ण मांडले. तसेच, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी अ ब क ड याबाबत सांगताना मातंग समाजाला किती आरक्षण येईल? सरकार नेमके कसे वर्गीकरण करणार? 59 जातींसाठी 13 टक्के आरक्षण आहे. त्यातील 7-8 टक्के आरक्षण मातंग समाजाला मिळावे, असे वाटत असले तरी ते शक्य आहे का? सरकार यातून काय मार्ग काढेल, याबाबत काही उपाय सुचवू शकतो का? हा प्रश्न सामंजस्यानं सोडवायचा आहे. आता, आरक्षण घेण्याची वेळ आहे, अशावेळी समाजातील हेवेदावे विसरून एकजूट दाखविणे गरजेचे आहे. यासाठी कृती समिती नेमणे गरजेचे आहे, अशा वेगवेगळ्या मुद्यांवर बोलत असताना त्यांच्या शब्दांचा, भाषेचा विपर्यास करून त्यांच्या या मुलाखतीचा विषय भरकटवीण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, ज्यांनी ढोबळे यांच्यावर खालील भाषेत टीका केली, त्यांच्याच वंचीत बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण वर्गीकरणास जाहीरपणे पाठींबा दर्शविल्याने प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठींब्यामुळे समस्त मातंग समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
